भडगाव तालुक्यातील कजगावजवळ घटना
भडगाव (प्रतिनिधी) :- रेल्वेरूळ ओलांडताना झालेल्या दुर्घटनेत रेल्वेखाली आल्यामुळे ३० वर्षीय तालुक्यातील कजगाव येथील तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दि. २० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश शामराव पाटील (वय ३०, रा. कजगाव ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. व्हॅन चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)दि. २० जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कजगाव जवळीलच श्री चक्रधर स्वामी रेल्वेलाईन वरून धावणाऱ्या गोवा एक्सप्रेस या रेल्वेखाली योगेश पाटील आल्याची माहिती पाचोरा जंक्शन वरून मेमोद्वारे चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांना मिळाली. चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह चाळीसगाव येथील सरकारी रुग्णालयात नेला होता. या प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.