भडगाव तालुक्यातील घटना : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ५ चोरटे दिसले
भडगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कजगाव येथे रविवारी दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच परिसरातील चार घरे फोडून धाडसी घरफोडी केली. संबंधित घरमालक बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेतला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
शंकरनगर परिसरातील यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून चोरट्यांनी अंदाजे १५ ते २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. यानंतर चोरट्यांनी अजयसिंग प्रतापसिंग पाटील यांच्या घराचे कुलूप तोडले मात्र येथे काहीही मिळाले नाही. पुढे स्वामी समर्थ मंदिराजवळील एका बँक कर्मचाऱ्याचे घर तसेच स्टेशन रोडलगत वर्धमान चोरडिया यांच्या घराचे कुलूप तोडण्यात आले, मात्र दोन्ही ठिकाणी चोरीसारखे काही मिळाले नसल्याचे समजते.
दरम्यान, स्वामी समर्थ मंदिराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाच चोरटे फिरत असल्याचे चित्रफीतमध्ये स्पष्ट दिसून आले आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी कजगाव पोलीस मदत केंद्रात दिवसा व रात्री दोन पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्याची व रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील, हवालदार किशोर सोनवणे तसेच गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.