रावेर तालुक्यातील नेहता येथील घटना

रावेर – वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर विळ्याने वार करून तिला ठार मारले आणि स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नेहता गावात पहाटे घडली. वृद्ध शेतकऱ्याने पत्नीस का ठार मारले याचे कारण कळू शकले नाही.
नेहता (ता. रावेर) येथील फकीरा तुकाराम वैदकर (वय ७३) आणि कमलाबाई वैदकर (वय ६६) हे दोघेही गावातील समाज मंदिरामागे असलेल्या नवीन प्लॉट्स भागात राहत होते. फकीरा वैदकर यांच्या तापट स्वभावामुळे त्यांचे त्यांच्या दोन मुलांशीही पटत नव्हते. ही दोन्ही मुले गावातच वेगळे राहत होते. फकीरा वैदकर नेहमीच पत्नीलाही मारण्याची भाषा वापरत असत.
दूध घेवून नात आली अन्
सकाळी त्यांची नात हर्षाली ही घरी दूध घेऊन आली असताना हा प्रकार उघडकीला आला. फकीरा वैदकर यांनी पत्नीच्या गळ्यावर तीक्ष्ण विळ्याने वार करून तिला ठार मारले. त्याच वेळी विजेच्या सुरू असलेल्या शेगडीवर देखील कमलाबाई पडून त्या भाजल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. फकीरा यांनी शेजारच्या खोलीत जाऊन गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली. नेहता येथील सरपंच महेंद्र पाटील, पोलीस पाटील सरला कचरे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावरून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे घटनास्थळी रवाना झाले आहेत.







