मुक्ताईनगर तालुक्यात वढवे येथील घटना, पुराव्यासाठी ‘ई-साक्ष’ तंत्रज्ञानाचा वापर
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- तालुक्यतील वढवे येथे एका तरुणाने घराच्या आवारात उभी असलेली कार ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादी किरण जानकीराम कोळी (वय ३३, रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) यांनी आपल्या राहत्या घराच्या कंपाउंडच्या आत त्यांची ‘स्विफ्ट डिझायर’ कार (क्रमांक: एमएच ०२सीडी ६८६७) उभी केली होती. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२:१५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मनोज भगवान ठाकरे (रा. यावल) याने काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून या कारला आग लावून दिली. या भीषण आगीत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या उद्देशाने आणि जीवे मारण्याची धमकी देत हे कृत्य केले आहे.
या घटनेनंतर पीडित किरण कोळी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आरोपी मनोज ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात पुराव्यासाठी ‘ई-साक्ष’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत बोदडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक यावलकडे रवाना झाले आहे.









