चिक्काबल्लापूर (वृत्तसंस्था ) – चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यामध्ये स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी जिलेटिनच्या कांड्यांचा बेकायदेशीरपणे साठा केला होता. पोलिसांच्या छापाच्या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच अचानक हा मोठा स्फोट झाला आहे. चिक्काबल्लापुरचे जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटकं बेकायदेशीरपणे साठा करून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असं सुधाकर यांनी म्हटलं आहे.








