चोपडा तालुक्यातील दोंदवाडे – तांदळवाडी
शिवारातील नदीत आढळला मृतदेह
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील स्टेडीयमजवळील भारत इंटरप्राईजेस येथे सेल्समन म्हणून काम करत असलेला तरूण बाहेर जावून येतो असे सांगून दुचाकी घेवून बेपत्ता झाला होता. या तरूणाची दुचाकी विदगावच्या तापी नदीच्या पुलावर आढळली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान जळगावच्या या तरुणाने विदगाव तापी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी दि. २ रोजी उघडकीस आली आहे. तरुणाचा मृतदेह चोपडा तालुक्यातील दोंदवाडे – तांदळवाडी शिवारा दरम्यान दुपारी १ वाजेच्या सुमारास मिळाला.
शहरातील शिवाजी नगरात राहणारा चंद्रकांत शांताराम मराठे (वय-३२) हा तरूण स्टेडीयमजवळील भारत इंटरप्राईजेस येथे सेल्समन म्हणून कामाला आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता चंद्रकातने आपली दुचाकी क्रमांक (एमएच १९, डब्ल्यू ५८७०) घेवून बाहेर पडला. चंद्रकांत कामाच्या निमित्ताने बाहेर गेला असे त्याचे वडील शांताराम मराठे यांना वाटले. मात्र बराच वेळ झाल्याने मुलगा घरी आला नाही म्हणून त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांनी मोठा मुलगा प्रदिप व मुलगी कल्पना यांना माहिती दिली. तसेच नातेवाईकांकडेही तपास केला. काहीच माहिती मिळाली नसल्याने दि. ३० सप्टेंबर रोजी शांताराम मराठे यांनी शहर पोलीस स्थानकात मुलगा चंद्रकात मराठे हा बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात केली.
दि. १ ऑक्टोबर रोजी चंद्रकांतची दुचाकी विदगाव तापी पुलावर आढळल्याने त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात होता.
आज दि. २ रोजी दुपारी १ वाजता चोपडा तालुक्यातील दोंदवाडे – तांदळवाडी दरम्यानच्या शिवारातील तापी नदीच्या किनाऱ्यावरील खडकावर अडकून पडलेला मृतदेह परिसरातील गुराख्यांना दिसून आला. त्यांनी दोंदवाडे गावाचे पोलीस पाटील नितीन अशोक पाटील यांना कळविले. घटनास्थळावर पाटील यांनी मृतदेहाची पाहणी केली आता त्याच्या खिशात वाहन चालविण्याचा परवाना मिळाला, चंद्रकांत मराठे असे या तरूणाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलीस पाटील यांच्यासोबत दोंदवाडेचे उपसरपंच मनोज युवराज पाटील, सामाजिक कार्यकर्ता सतीश अशोक पाटील यांनी सहकार्य केले. तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिल्यावरून पो.ना. संदीप धनगर,पोहेकॉ. भरत नाईक यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आहे. मृतदेहाची वाईट अवस्थ झाल्यामुळे घटनास्थळावरच चंद्रकांत मराठे यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. नातेवाईक जळगावहून घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले आहे.








