लाभालाभे सुहे दुक्खे, जीवीय मरणे तथा। समो निंदा-पसंसासु, तहा माणवमाणओ ॥ याचा अर्थ असा की, लाभ-अलाभ, सुख-दुःख, जीवन-मरण, निंदा- प्रशंसा, मान-अपमान या सर्वामध्ये राग-द्वेष करत नाही तो समभावी साधक असतो. असे महत्त्वाचे तत्त्व उत्तराध्यायनसुत्रच्या १९ व्या अध्यायातील ९१ व्या गाथेमध्ये सांगितले गेले आहे. हे तत्त्व जीवनाचे खरे सार आहे याबाबतचे चिंतन प्रत्येकाने करायला हवे. उत्तराध्यायन सूत्रच्या १९ व्या अध्यायाचे वाचन, अभ्यास करा, जीवनात समभावी साधक बना असे आवाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी प्रवचनातून केले.
हे प्रभु आनंद-दाता, ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों को, दूर हमसे कीजिए।
लीजिए हमको शरण में, हम सदाचारी बनें, ब्रह्मचारी धर्म-रक्षक, वीर व्रत धारी बनें।
॥ हे प्रभु आनंद-दाता ज्ञान हमको दीजिए…॥ या प्रार्थनेचा संदर्भ घेत आपल्या व्यक्तीमत्त्वात गुणांचा संचय करायला हवा. प्रत्येक ठिकाणी धनाने नव्हे तर ज्ञानाने देखील गुणांची मोजणी होत असते. साधना करण्यासाठी पुरुषार्थ लागतो. मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी साधकाने तामसी आहाराचा त्याग करावा. सात्विक आहार घेतला तर मन स्थिर राहण्यास मदत होते. यासोबतच टिव्ही, मोबाईल इत्यादी साधनांपासून साधक किंवा विद्यार्थ्यांनी दूर रहावे. परावर्तनाने ज्ञान स्थिर होते आणि अनुप्रेक्षा मुळे ज्ञान गंभीर बनते असेही महाराज साहेबांनी सांगितले.या प्रवचना आधी परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी उत्तराध्यायनसूत्रच्या अध्यायांचा गोषवारा समजावून सांगितला. त्यात प्रत्याख्यान केल्याने काय लाभ होतो, आश्रव म्हणजे काय, कर्मांची निर्जरा इत्यादी गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या.