प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) :- जीवनात परिवर्तन घडवितो तोच खरा सत्संग होय! ‘सत्संग’ या शब्दाची व्याख्या अत्यंत सोप्या शब्दात आणि अनेक उदाहरणांचे दाखले देत श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तीनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनातून स्पष्ट करून सांगितली. याच बरोबर क्रमशः सुरू असलेल्या ऋषीदत्ता यांच्या विषयी अख्यायिकेतील कथानक सुद्धा प्रस्तूत करण्यात आले. ऋषीदत्ता उदास मनाने वडील भेटतील अशी मनात इच्छा धरते. ऋषीदत्ताची इच्छा मात्र काही वेळात साकार होते. तिच्या दृष्टी समोर तिला साक्षात पिता दिसतात, असेही त्या म्हणाल्या.
‘सत्संग’ आणि ‘तप’ यामुळे जीवनात आमुलाग्र बदल घडवितात. निरर्थक गोष्टींची चर्चा करून परिवर्तन घडत नसते. हे स्पष्ट करण्यासाठी नंदीमित्र यांचे उदाहरण आज धर्मसभेत प्रस्तुत करण्यात आले. नंदीमित्र यांना फक्त तीन दिवसांचा सत्संग लाभला त्यांना संथारा पंडीतमरण प्राप्त झाले आणि पुढील जन्मी तेच नंदीमित्र चंद्रगुप्त राजा म्हणून राजघराण्यात जन्मास आले. सत्संगाचा असा महत्तम प्रभाव असतो. “प्रवचनात येणे सोपे असते पण प्रवचनाचे विचारतत्वे, मंगलगुण आपल्या जीवनात उतरविणे फारच कठीण असते…” ज्यांनी आपल्या जीवनात फक्त एकच प्रवचन ऐकले आणि जीवनात मोठे परिवर्तन घडले, आध्यात्मिक उत्कर्ष साध्य केला, असे अनेक उदाहरणे आहेत. प्रवचन, व्याख्यानाने जीवनात थोडा ही बदल झाला तर प्रवचनाचे सार्थक झाले असे समजावे. अर्जुन माळी, सुधर्मास्वामी, जंबुस्वामी यांच्या जीवनात धार्मिक प्रवचन, व्याख्यान व तपामुळे परिवर्तन घडू शकले.
आत्म परिवर्तनासाठीच प्रवचने, व्याख्याने असतात असे मौलिक विचार प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा. यांनी आजच्या प्रवचनातून उपस्थितांना दिला. प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांच्यासह आदी ठाणा सहा यांच्या पावन सान्निध्यात आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात मंगलमय आत्मोत्कर्ष चातुर्मास सुरू आहे. ‘अर्चना’ साध्वी (सतिया) मंडळातील प.पू. डॉ. इमितप्रभाजी म. सा. यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने त्यांना काव्यमय शुभेच्छा दिल्या गेल्या.