जारगाव चौफुलीवर पोलिसांची धडक कामगिरी
पाचोरा (प्रतिनिधी) : शहरातील जारगाव चौफुली येथे पोलिसांनी एका संशयित इसमाला २ गावठी कट्टे आणि ४ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज खान जहुर खान (वय २४ वर्षे, रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जारगाव चौफुली, पाचोरा परिसरात एक इसम गैरकायदेशीर अग्नीशस्त्रे (गावठी कट्टे) घेऊन फिरत आहे आणि तो कोणत्यातरी गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे वापरू शकतो. या माहितीनुसार, पोहेकॉ राहुल शिंपी आणि पोकॉ दिनेश पाटील यांनी स्थानिक २ पंचांच्या उपस्थितीत सापळा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
दि. २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारे ४:३० वाजता पोलिसांनी जारगाव चौफुली परिसरात छापा टाकला. यावेळी संशयित इसमाच्या कंबरेजवळ वारंवार हात लावत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला चारही बाजूंनी वेढा घातला. जहुर भाई रेडीअर्स दुकानाजवळ पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी तो पॅन्टच्या खिशात हात घालत असल्याचे पाहून पो. काॅ. दिनेश पाटील यांनी त्याचे दोन्ही हात दाबून धरले. त्याच्या अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी २० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे आणि २ हजार रुपये किंमतीचे ४ जिवंत काडतुसे सापडले. त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत.