चोपडा (प्रतिनिधी):- आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) चोपडा शाखेतर्फे नुकतेच एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. १६ जानेवारी रोजी तालुक्यातील जिरायत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तथा आश्रम शाळेत हा कार्यक्रम पार पडला.

दुपारी ३ ते ५ या वेळेत रंगलेल्या या कार्यक्रमात अंनिसचे चोपडा शाखा कार्याध्यक्ष डॉ. अय्युब आर. पिंजारी यांनी विविध ‘चमत्कार’ करून दाखवले आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली. यामध्ये प्रामुख्याने जिभेतून त्रिशूल आरपार करणे, पाण्याचा दिवा लावणे, गोड बाबाचा चमत्कार, पाण्याचा अखंड झरा, दारूपासून दूध बनविणे हे प्रयोग पाहून विद्यार्थी आणि ग्रामस्थ थक्क झाले होते. “बुवाबाजी आणि चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रत्येकाने वैज्ञानिक विचार करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. पिंजारी यांनी यावेळी केले.
या शिबिरात डॉ. पिंजारी यांच्यासोबत अंनिसचे कार्यकर्ते संजय पीरा अहिरे आणि अनिल गोरख वाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, शिक्षक प्रमोद देवरे, तसेच बिलदार पावरा, मगन बारेला, प्रताप बारेला आणि शिवाजी आव्हाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे परिसरातील पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी कौतुक केले आहे.










