चाळीसगाव तालुक्यातील खेडगावात नागरिक त्रस्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील जिओ ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेट आणि मोबाईल सेवांच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे जिओचे नेटवर्क कव्हरेज परिसरातून गायब झाल्याने नागरिकांना संपर्क साधण्यात आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत.
गावात जिओचा टॉवर असूनही, ध्वनी लहरी प्रसारित करण्यात येत असलेल्या तांत्रिक समस्येमुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. यामुळे जिओ ग्राहकांना मोबाईलद्वारे संपर्क साधणे, फोन पे तसेच छोट्या-मोठ्या बँकिंग सेवा वापरणे अशक्य झाले आहे. ग्रामस्थांनी या समस्येमुळे भेडसावणाऱ्या अडचणींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक जिओ सर्विस प्रोव्हायडरकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेटवर्क समस्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित जिओ सर्व्हिस सेंटर आणि जिओ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून, लवकरात लवकर ही समस्या सोडवली जाईल असे आश्वासन ऑपरेटरकडून देण्यात आले आहे. मात्र, या समस्येमुळे खेडगावातील जिओ ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.