जगातील प्रत्येक प्राण्याला कुठले ना कुठले भय असते. लहान असो वा मोठा प्रत्येकाला भय असते. भय आपल्या कल्पनेत असते. भय आपल्याला पंगू बनविते. खरे तर भय आपल्या मनात निर्माण होते. लहानपणी बाळाला घास भरविला जातो तो खात नसेल तर खाऊन घे नाही तर बुवा येईल… पोलीस येईल पडकडून नेईल अशी भीती लहानग्यांच्या मनात निर्माण केली जाते. मनात कोणतेही भय बाळगू नये जिनवाणीवर विश्वास ठेवावा असे आवाहन शासन दीपक परमपुज्य सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी प्रवचनात सांगितले.
भया विषयी उदाहरण स्पष्ट करताना कुत्रा व मानवाची गोष्ट सांगितली. कुत्र्याला स्वामीची आवश्यकता असते. जो कुणालाही भीत नाही असा स्वामी तूच निवड असे परमेश्वराने सांगितले. कुत्रा हत्तीला स्वामी निवडतो, हत्ती पण वाघ सिंहाला घाबरतो, मग त्याने सिंहाला स्वामी म्हणून निवडले, सिंह तर माणसाला घाबरतो मग कुत्र्याने माणसाला आपला स्वामी निवडले. कोरोनाच्या काळात आजाराने फार कमी लोकांचा मृत्यू झाला परंतु भयानेच अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. केळी खाऊन त्यावर पाणी प्यायल्यावर सर्दी-खोकला येतो ही अशास्त्रीय बाब अनेक जण मनात बाळगताना आजही दिसतात. काही अंधश्रद्धेवर आपण चिकटवून बसतो अशीच एक अंधश्रद्धा चिकटल्याने आजही १३ नंबरची खोली हॉटेलमध्ये नसते. १२ नंतर थेट १४ नंबरची खोली असते कारण १३ नंबर हा अशुभ मानला जातो म्हणून १३ नंबरची खोली नसतेच मुळी! भयगंडाने पछडल्यानेच गळ्यात गंडे-दोरे, ताबीज बांधले जातात. आपण कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये व जिनवाणीवर विश्वास ठेवावा असे आवाहन परमपुज्य महाराज साहेबांनी केले. परमपुज्य भुतीप्रज्ञ महाराज साहेब यांनी सम्यकदृष्टी लक्षण सांगून आगममध्ये आत्मकल्याणासाठी ६ यत्ना सोदाहरण मार्गदर्शन केले.









