जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीसमोर कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, जळगाव जिल्हा घटकात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये दाखल असलेल्या १९ गुन्ह्यांमधील सुमारे १७०६ किलोग्रॅम अंमली पदार्थ (गांजासह अफूची बोंडे आणि गुंगीकारक औषधे) आज, दि. ३० रोजी नष्ट करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाचे फौजदारी अपील क्र. ६५२/२०१२ मधील निर्देश तसेच केंद्र सरकार आणि मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनांनुसार जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याच्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. जळगाव जिल्हा घटकात या कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह), अरुण आव्हाड आणि कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी योगेश इंगळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
आज सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत जिल्हापेठ पोलीस स्टेशन इमारतीच्या मागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीसमोर कागदपत्रांची पडताळणी करून, हा संपूर्ण १७०६ किलोग्रॅम गांजा खड्डा खोदून नष्ट करण्यात आला. संपूर्ण नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. सदरची महत्त्वपूर्ण कार्यवाही जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि सदस्य अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण आव्हाड तसेच सहाय्यक कृषी अधिकारी आणि निरीक्षक वजनमापे राजेंद्र व्यवहारे यांच्या उपस्थितीत पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. संजय दोरकर, पो.ह. सुनील दामोदरे, पो.ह. जयंत चौधरी, पो.ह. संदीप पाटील, पो.ह. राहुल बैसाने, म.पो.ह. नीता राजपूत, पो.अं. रवींद्र चौधरी (सर्व स्था.गु.शा., जळगाव) यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.