जिल्हा होणार हरित ऊर्जायुक्त, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : येत्या काळात जिल्ह्यातील ८ सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जात असून, त्यातून १ लाख ९४ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा हरित ऊर्जायुक्त बनवण्यासाठी प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजना व मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना राबविली जात आहे. यातून शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान देऊन शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच महा आवास अभियानांतर्गत जिल्ह्यातील पात्रधारकांना दीड लाख घरे बांधून दिले जाणार असल्याचे सांगितले. स्वच्छ पिण्याचे पाणी जिल्ह्यातील नागरिकांना मिळावे यासाठी जल जीवन मिशन आणि अमृत २.० योजनेद्वारे जिल्ह्यातील गावांमध्ये स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
यामुळे प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी सहज उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जिल्ह्यात ४ लाख १९ हजार शेतकरी लाभार्थी आहेत. तसेच, पीक विमा योजनेतून ३ लाख ८७ हजार शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले असून केळी उत्पादकांसाठी राष्ट्रीय फळबाग विकास कार्यक्रमांतर्गत १०० कोटींच्या विशेष योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधोरेखित केले.