जळगावात दुचाकी शोरुमवर दगडफेक; किरकोळ वाद वगळता बंद शांततेत
जळगाव (प्रतिनिधी ) ;- बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जळगाव जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली होती. मात्र जळगाव शहरात हिंदू समाजाच्या संघटना कार्यकर्त्यांनी शहरातील उघडे असलेलं एक दुचाकीचे शोरूमवर दगडफेक करण्यात आल्याने नुकसान झाल्याची घटना घडली. बंद दरम्यान हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचे दिसून आले. तसेच लहानमोठ्या व्यावसायिक , हातगाडी विक्रेते , रिक्षा व्यावसायिक आदींनी बंदला पाठिंबा देऊन आपला प्रतिसाद दिल्याने बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.
आज १६ रोजी सकाळपासूनच हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बंद पाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होते. जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात असणाऱ्या राम होंडा हे दुचाकी शोरूम सुरूअसल्याचे दिसून आल्याने सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने यात शोरूमच्या काचा फुटून तसेच समोरच्या जाहिरातीच्या फलकची तोडफोड करण्यात आल्याने नुकसान झाल्याची घटना घडली .
या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन संतप्त जमावावर नियंत्रण मिळवून सकल हिंदू समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करून त्यानंतर मोर्चा पुढे मार्गस्थ झाला.दरम्यान जळगाव शहरातील विविध ठिकाणी असणारे व्यापारी संकुले बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन बंदला आपला प्रतिसाद दिला . तसेच अनेक ठिकाणी हिंदू समाज संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन घोषणाबाजी करून दुकाने बंद करण्याचे आवाहन करतांना दिसून येत होते .
मोर्चामध्ये यांचा होता सहभाग
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला . या मोर्चाचे नेतृत्व महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज,आमदार राजूमामा भोळे,खासदार स्मिता वाघ , माजी खासदार डॉ. उल्हास पाटील , डॉ. केंटकीताई पाटील दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख , कुलभूषण पाटील, रिपाइं महानगराध्यक्ष अनिल अडकमोल , यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील मुख्य बाजारपेठा बंद
शहरातील सुभाष चौक , सिंधी कॉलनी येथील भाजी बाजार, दाणा बाजार , सराफ बाजार, फुले मार्केट,गांधी मार्केट,बीजे मार्केट, गोलाणी मार्केट यासह विविध व्यापारी संकुले बंद असल्याचे दिसून आले . तर शहरात तुरळक वाहतूक दिसून आली . ठिकठिकाणी बंदचे पडसाद उमटून आले. यावेळी पोलिसांतर्फे मुख्य चौकांमध्ये चोख बंदोबस्थ ठेवण्यात येऊन फिरत्या गस्त पथकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात येत होती.