जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेची निवडणूक एक निमित्त आहे . या यशाची मला खात्री होती . आपला जनाधार पुढे टिकवत वाढवावा लागणार आहे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे यश दिसते आहे . लोकांना जोडण्यात कमी पडू नका . नुसत्या वातावरणाच्या हवेने निवडणूक जिंकता येत नाही . आगामी वर्ष निवडणुकांचे आहे , जिल्हा राष्ट्रवादीच्या झंझावाताने दणाणून गेला पाहिजे , नकारात्मकता झटकून टाकत आतापासून कामाला लागा. शरद पवारांचा जळगावात लाखांचा मेळावाही घ्यायचा आहे . विरोधक हैराण करायचेच आहेत , गाफील राहू नका आणि मेहनतीत कमी पडू नका , असा कानमंत्र आज पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची आज जिल्हा कार्यालयात बैठक झाली . या बैठकीत १२ डिसेंबररोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांचे नियोजन , ५ डिसेंबररोजीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा , नवी सदस्य नोंदणी , जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आदी मुद्द्यांवर चर्चा झाली . विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी , माजी मंत्री सतीश पाटील , माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर , माजी आमदार दिलीपराव वाघ , जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर , माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , आमदार अनिल भाईदास पाटील , माजी खासदार मोरेकाका , माजी आमदार मनीष जैन , तिलोत्तमा पाटील , महिला आघाडीच्या जिहाध्यक्ष वंदना चौधरी आदी मान्यवरांसह जिल्हा बँकेचे पक्षाचे नवनिर्वाचित संचालक व विविध आघाड्यांचे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते .
यावेळी जिल्हाध्यक्ष अँड रवींद्र पाटील यांनी पक्ष संघात वाढीसाठी महत्वाच्या सूचना देत तालुका कार्यकारिण्याची फेररचना करून त्या जाहीर करण्याच्या सूचना सर्व तालुकाध्यक्षांना दिल्या . सभासद नोंदणीसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आवाहनही केले . सर्वच नेत्यांनी आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते उत्साहात असल्याचे आवर्जून अधोरेखित केले . शरद पवारांचा वाढदिवस यंदा जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करताना गरजू लोकांना उपयोगात पडेल अशी मदत या वाढदिवसाच्या उपक्रमांमधून झाली पाहिजे , अशी अपेक्षा गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केली . पक्षाची संघटना मजबूत ठेवणे , संघटनेचा विस्तार आणि आगामी जिल्हा परिषद , नगर परिषदा , बाजार समित्या , विकास सोसायट्या , पंचायत समित्या , अन्य सहकारी संस्थांच्या आगामी वर्षभरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी वरच्या स्थानावर पोहचला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे , यंदाचा शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे इच्छुक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्याची चांगली संधी आहे , जिल्हा परिषदेसह आगामी सर्वच निवडणुकांमधून आपल्या पक्षाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून जनतेत गेले पाहिजेत अशा सूचना सर्वच नेत्यांनी केल्या . सतीश पाटील , आमदार अनिल भाईदास पाटील , मोरेकाका , अरुणभाई गुजराथी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले .
जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बोलताना एकनाथराव खडसे यांनीं अपेक्षेप्रमाणे जिंकण्याच्याच त्वेषाने लढा , असा सल्ला देत भाषणाला सुरुवात केली . ते पुढे म्हणाले की , जिल्हा बँकेत राष्ट्रवादी स्वबळावर येणार याची मला खात्री होती . आता भविष्यात आपल्याला बळ वाढवावे लागेल . माजी आमदार अरुण पाटील भाजपजवळ गेले . त्यांना सर्वांनी पाठिंबा दिला होता मात्र मतदानानन्तर निकाल पालटला अशा बऱ्याच गोष्टी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घडल्या . कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो तेंव्हा राजकारणात यश मिळते . पक्ष संघटनेत मतभेद नसावेत . आता लोकांना आपले यश दिसत असताना निवडणुकीत उमेदवारांची निवड पण काळजीपूर्वक केली जाणार आहे . जो जितके जास्त सक्रिय सदस्य पक्षाशी जोडीन त्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उमेदवारीचा दावा करण्याचा अधिकार मिळणार आहे . आधी तुम्ही पक्षासाठी काहीतरी करा , नाहीतर पक्षात नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी असे व्हायला नको . भाषण ठोकले की झाला नेता असे नसते . मागास , मुस्लिम , समाजातील छोटे गट , महिला , तरुण अशा सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचले पाहिजे . महापालिकेत मीच धक्का दिला होता . जिथे यश दिसते तिथे लोक येतात आणि ते स्वाभाविकही आहे . लोकांना आणि कार्यकर्त्यांना आपला नेता यश मिळवून देणारा हवा असतो . जिल्हा परिषद आपल्या पक्षाला एकट्याच्या बळावर मिळवायचीच आहे . हे वर्ष निवडणुकांचे आहे आपल्याला ताकद वाढवावी लागेल तरच विधानसभा सोपी होईल . नुसत्या वातावरणाच्या हवेने निवडणूक जिंकता येत नाही . सरकार येते जाते , पण पक्ष संघटना महत्वाची आहे . जिल्हा दूध संघाला आता ५० वर्षे पूर्ण होता आहेत आणि आपण नशीबवान आहोत की तेथे सध्या आपली सत्ता आहे जिल्हा दूध संघ राज्यात वरच्या क्रमांकावर आहे . सातत्याने २५ कोटी रुपये निव्वळ नफा मिळतो आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्हा दौऱ्याने जिल्हा दणाणून गेला पाहिजे त्यांच्या कार्यक्रमांसाठी प्राचीन संख्येने लोक येतील याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे शरद पवारांचा लाखांच्या संख्येतील मेळावा सागरपार्कवर घ्यायचा आहे त्याचे ट्रेलर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भुसावळात कार्यक्रमांमधून दिसले पाहिजे , असेही ते म्हणाले.