जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला आहे . जामनेर तालुक्यातील तळेगाव परिसरातील भागदरा , कासली , तळेगाव , शेलगाव , सावरला ही ५ गावे जलमय झाली आहेत. दुसरीकडे तापाने आजारी असलेल्या अमळनेर तालुक्यातील सात्री येथील ११ वर्षीय आरुषी भिल या मुलीला नदीला आलेल्या पुरामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने जीवाला मुकावे लागले ! या दोन्ही तालुक्यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री गावात मंगळवारी दुर्दैवी आणि शासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना घडली पावसामुळे बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला अशातच तापाने फणफणत असलेल्या एका 11 वर्षीय मुलीला वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही. त्यामुळे उपचाराअभावी तिचा नदीच्या काठावरच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आरुषी सुरेश भिल असे मृत मुलीचे नाव असून, ती सात्री येथील रहिवाशी होती.
सात्री गावातील सुरेश भिल यांची मुलगी आरुषी काही दिवसांपासून तापाने आजारी होती. मंगळवारी ताप वाढल्याने तिला अत्यवस्थ वाटू लागले. तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई – वडिलांनी केली. पण नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. इकडे आरुषीची तब्येत आणखीनच बिघडली. काही ग्रामस्थांनी एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. परंतु, तोवर उशीर झाला होता. दवाखान्यात पोहचेपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आरुषीचा जीव वाचला नाही. म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रशासनाला आणखी किती जणांचे जीव गेल्यावर जाग येईल, असा संतप्त सवाल यावेळी ग्रामस्थांनी केला.
भागदरा गावात पाणी शिरले
जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे अनेक भागात मुसळधार पावसामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे उंबर नदीला पूर आला वादळामुळे भागदरा गावांत घरांवरील पत्रे उडाली उंबर नदीचे पाणी भागदरा गावात शिरले असून गावाजवळ असलेला तलावदेखील फुटल्याने गावात पाणी शिरले रस्तेदेखील वाहून गेले. शेतांमध्येदेखील पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचेही नुकसान झाले आहे.
तळेगाव परिसरात ढगफुटीचे थैमान
जामनेर तालुक्यातील तळेगावसह परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नद्या , नाले भरून वाहू लागले याचा फटका तळेगावकरांना बसला तळेगाव येथील नदीला पूर आल्याने बसस्थानक परिसरातील घरे व दुकाने पूर्णपणे पाण्यात गेली. ग्रामपंचायत कार्यालयातदेखील पाणी घुसल्याने दप्तर ओले झाले मोठ्या प्रमाणावर नुकसान परिसरात झाले आहे. या पाण्याचा फटका शेतीला देखील मोठ्या प्रमाणात बसला. ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तळेगाव, शेळगाव, कासली, सावरला परिसरातील शेतीचेदेखील पंचनामे करण्याची वेळ आली आहे. भरपाईची मागणी शेतकरी करीत आहे.सुधाकर हिवाळे, सुपडाबाई कांबळे, कडुबा कोळी तसेच मन्यार बंधू यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे नाश पावल्या बसस्थानक परिसरातील हॉटेल व दुकान, पान टपऱ्यामध्ये देखील पाणी शिरल्याने दुकानातील सामान यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने मदत करावी अशी मागणी परिसरात होत आहे सावरला येथील महिला ॲम्बुलन्समधून हॉस्पिटलला जामनेरला नेत असताना तळेगावमध्येच अडकल्याने पुराच्या पाण्यातून काढत त्या महिलेला तळेगाव येथील दवाखान्यात दाखल करावे लागले तळेगावात विद्युत खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून वीज कधी येईल याची शाश्वती कुणीही देत नाही
आमदार गिरीश महाजन सध्या मुंबईत असल्याने त्यांच्या पत्नी आणि जामनेरच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांनी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना दिलासा दिला.