शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश जारी
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे मंगळवारी २५ जुलै रोजी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील ८ जणांची गट ब संवर्गातून गट अ संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील मुख्याधिकारी अविनाश विष्णू गांगोडे, भगूर येथील मुख्याधिकारी निर्मला मंगळू गायकवाड यांचीदेखील जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना झाली आहे.
राज्यभरातील ८ मुख्याधिकारी, सहायक आयुक्त पदावरील व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देऊन पदस्थापना करण्यात आली आहे. यात अविनाश गांगोडे, निर्मला गायकवाड जिल्ह्यातून येत आहेत. तर भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश शिवाजी वाघमोडे यांना त्याच पदावर गट अ च्या कार्यरत पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर धरणगावचे मुख्याधिकारी जनार्दन पंढरीनाथ पवार यांची मालेगाव महानगरपालिकेच्या उपयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. सदर परिपत्रक आदेशावर उप सचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांची सही आहे.