जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला यश मिळाल्याने आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका तिन्ही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असे संकेत आज शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले .
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 21 पैकी 20 जागा जिंकून मोठे यश मिळविले या यशामुळे तिन्ही पक्षांना बळ मिळाले आहे. आगामी निवडणुका जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील अशी चर्चा सुरू आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत.स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. येत्या जिल्हा परिेषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार आहे, असे चित्र जिल्ह्यात आहे.
तुम्ही तीन पक्ष या निवडणुकीत एकत्र येवू शकणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल असे कुणाला वाटत होते का? परंतु तीन पक्षाचे सरकार आलेच ना! जिल्हा बँक निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आलेच ना मग जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.