दर महिन्याला नियमितरित्या करण्यात येते तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) : आरोग्य विभागामार्फत माहे ऑगस्ट २०२५ मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण १७५५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२ जलस्रोत जैविक दृष्ट्या बाधित आढळून आले आहेत. सदर बाधित स्त्रोतांवर ग्रामपंचायतमार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समवेत सुपरक्लोरिनेशनची कार्यवाही करण्यात आली असून, त्यानंतरचे पाणी नमुने प्रयोगशाळेत पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. प्रयोगशाळेमार्फत पुनर्तपासणीची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान ही तपासणी नियमितरित्या करण्यात येत असते. तपासणीत जैविक व अन्य कारणास्तव पाणी नमुने बाधित किंवा संशयास्पद आढळून आल्यास उपाययोजना करून पुर्नतपासणी ची प्रक्रिया करण्यात येते. जिल्हा प्रशासनामार्फत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, संबंधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील जलस्रोत स्वच्छ राहावेत यासाठी सातत्याने तपासणी व उपाययोजना सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.