राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्टीद्वारे दारूची निर्मिती व विक्री सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकत्रित धाडसत्र राबवण्यात आले. बुधवार दि.९ रोजी राबवण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत जिल्हाभरात १३४ गुन्हे नोंदवण्यात आले.
यामध्ये ३,३८५ लिटर गावठी दारू आणि २०,१५० लिटर कच्चे रसायन (हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे) जप्त करण्यात आले. या मुददेमालाची एकूण किंमत १४,४८,६६२ रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलिस विभागाच्या वतीने एकूण ९९ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २,८४५ लिटर हातभट्टी दारू व ५,६३० लिटर रसायन जप्त करण्यात आले. या मुददेमालाची किंमत सुमारे ६,१२,३८२ रूपये इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्हे नोंदवत ५४० लिटर गावठी दारू, १४,५२० लिटर रसायन आणि अवैध वाहतूक करणारे एक चारचाकी वाहन असा सुमारे ८,३६,२८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई अधीक्षक व्ही. टी. भुकन, निरीक्षक डी. एम. चकोर, निरीक्षक अशोक तारू, भरारी पथकाचे निरीक्षक मोमीन, चोपडा निरीक्षक किशोर गायकवाड, चाळीसगावचे राठोड आदींनी हि कारवाई पार पडली आहे.