शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव शहरात आढळून आला होता. विशेष म्हणजे कुठलीही “ट्रॅव्हल्स हिस्ट्री” नसताना मात्र एका ४५ वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली यशस्वीरीत्या उपचार झाल्यावर १३ दिवसांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे उपस्थितीत महिलेला रुग्णालयातून निरोप देण्यात आला.
जळगाव शहरातील एका भागात रहिवासी असलेली ४५ वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी तातडीने या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पाराजी बाचेवार, मेंदुविकृतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. अभिजित पिल्लई, डॉ. गोपाळ घोलप यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात उपचार केले. त्यांना डॉ. अमित भंगाळे, डॉ. सायली पाटील, डॉ. गोविंद मुंडे, डॉ. मयूर भोसले यांचे सहकार्य लाभले.
वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी कौतुक केले. सदर महिला रुग्णाला १३ दिवस उपचारनंतर बरे झाल्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.