चाळीसगाव शहरात रेल्वे स्थानक परिसरात गांजा पिणाऱ्यांचा धुमाकुळ
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील रेल्वे स्थानक परिसरात गांजा पिणाऱ्या लोकांचा धुमाकुळ वाढला आहे. त्यातच गुरुवारी रात्री रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांनी जोरदार भांडण झाले. एकाने त्याच्याकडील बेकायदेशीर पिस्तूल काढून थेट गोळीबार केला. यात तिसऱ्याच तरुणाला गोळी लागल्याने खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दीपक मरसाळे व चेतन गोल्हार हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका झोपडी जवळ हा प्रकार घडला आहे. गुरुवारी दि. १८ रोजी रात्री दीपक व चेतन यांच्यासह चेतनच्यासोबत असलेला रोहित कोळी हे तेथे गांजा पीत बसले होते. यावेळी दीपक आणि चेतन यांच्यात जुन्या वादातून जोरदार भांडण झाले. या भांडणातून दीपक मरसाळे यानी चेतन गोल्हार याच्यावर बंदुकीतून दोन राउंड फायर केले.
यातील एक गोळी रोहित कोळी याच्या पायाला लागली तर दुसरी निसटून गेली. दरम्यान मध्यरात्री गांजाचा नशा उतरल्यावर रोहित कोळी याला बंदुकीची गोळी लागल्याची शंका आल्यावर तो ग्रामीण रुग्णालयात भरती झाला.घटनेची पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक अमित मनेल व गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली. तसेच जखमीचा जबाब घेण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत संशयित आरोपीला अटक करण्याचे काम सुरू होते. दरम्यान जिल्हाभरात गोळीबाराच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.








