पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाळधी येथे शुभारंभ
जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य शासनाच्या “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये एकाचवेळी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ पाळधी येथे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, तसेच पाळधी येथील सरपंच, ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण करणे असून, “आईच्या” नावे एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश यामधून दिला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शेकडो जिल्हा परिषद शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून, शालेय परिसरात हरित पट्टा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात या मोहिमेचे प्रभावी आयोजन करण्यात आले असून, शालेय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा सहभाग लक्षणीय ठरतो आहे. हा उपक्रम पर्यावरण रक्षणासोबतच सामाजिक भावनिक बंध निर्माण करणारा ठरणार असून, प्रत्येक झाडाला ‘माँ’ चे नाव देऊन त्याचे संवर्धन केले जाणार आहे. जिल्ह्यातील हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.