जिल्हाभर २२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभांचे नियोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- केंद्र शासनाने दिलेल्या सूचननेनुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत हागणदारीमुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव स्तरावर वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयाची बांधकाम तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण करून गावे शाश्वत करण्यासाठी राज्यात ३० ऑक्टोबर पासून विशेष स्वच्छता अभियान राबवले जात आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान प्रभावीपणे राबवावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी केले आहे.
या विशेष अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालय बांधणे शिल्लक आहे, अशा कुटुंबाची यादी तयार करून त्यांना शौचालय बांधकामाचा लाभ तसेच सांडपाणी व्यवस्थापना साठी वैयक्तिक शोष खड्डे तयार करणे, घनकचऱ्यासाठी खतखडे तयार करून व्यवस्थापन करणे, प्लास्टिक संकलनासाठी सेग्रीगेशन शेड, कचरा उचलण्यासाठी ट्राय सायकल असे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी तालुक्यातील गावांचे नियोजन करून गावे हागणदारीमुक्त अधिक करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हागणदारी मुक्त अधिक गावासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये २२ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावांना मान्यता देणे तसेच शौचालय बांधकामासाठी प्रबोधन करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करणे, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी शौचालय बांधकाम होण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करणे. दिनांक १ जानेवारी २०२४ नंतर गावात एकही कुटुंब उघड्यावर शौचास जाणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना या संदर्भात प्रबोधन करणे. तसेच हागणदारी मुक्त अधिक साठी लागणारे ठराव व्हिडिओ चित्रीकरण या विषयासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.