११ विधानसभा मतदारसंघांत ३६ लाख ७८ हजार मतदार
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यासह राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ६८६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान सुव्यवस्थित, शांततापूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे १६ हजार ३५२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघांत ३६ लाख ७८ हजार ११२ मतदार आहेत. ११ विधानसभा मतदारसंघातून ३६ राष्ट्रीय स्तरावरील विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष असे १३९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ३६३ सेक्टर असून ३६८३ मतदान केंद्र, ३३ एसएसटी पॉइंट, ३३ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३ हजार ६८३ मतदान केंद्रं आहेत. यात २७७ केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक आहेत. यात विशेषता जळगाव आणि मुक्ताईनगर अन्य परिसरातील २ हजार ९६५ केंद्रांवर वेबकास्टींग केले जाणार आहे.
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांतता, सौहार्दपूर्ण, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी मतदान केंद्र, सेक्टर पेट्रोलिंग, महसूल झोन पेट्रोलिंग, बॉर्डर सिंलिंग, स्ट्रांग रूम असे कायदा सुव्यवस्थेंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.यात जिल्हा पोलीस दलाचे २ हजार ५६९ अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. यात पोलीस अधीक्षक १, अपर पोलीस अधीक्षक २, उपविभागीय पोलीस अधिकारी ८, पोलीस निरीक्षक ३३, सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक १४९, सहायक फौजदार, पो.हे.कॉ. पोलीस कर्मचारी असे २ हजार ५६९ पोलीस बल तैनात आहे.
जिल्ह्याच्या लगत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील तीन जिल्ह्याची सीमा आहे. त्यानुसार या परिसरात ७ आंतरराज्य तपासणी नाके तसेच वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच महसूल आणि पोलीस प्रशासन असे विविध विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक काळात मतदारांना आमिष प्रलोभनासाठी अवैध रोख रकमेसह अंमलीपदार्थाची वाहतूक होऊ नये यासाठी वाहनांची कसून तपासणी केली जात असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. या वेळी यावल उपवन संरक्षक जमीर एम. शेख, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता काळात ३६ अवैध शस्त्रे कारवाई करण्यात आली. यात १९ अग्निअस्त्रे, १६ धारदार शस्त्रे, १ एअरगन, २५ जिवंत काडतुसे असा ११ लाख ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दारूबंदीअंतर्गत ७५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून १ कोटी ९२ लाख ३० हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ लाख ६७ हजार ६७७ रुपये किमतीचा २१७ किलो गांजा आदी अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अन्य ३३ कारवायात ४ कोटी ७ लाख ९९ हजार ३९७ रुपयांची कारवाई तर ४ कोटी ७४ लाख ९८८ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी परिसरात जिंगल्स व्हिडिओ रिल्सद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांवर अत्यावश्यक आरोग्य सुविधांसह २ हजार ७३५ आशा वर्कर्स नियुक्त करण्यात आल्या आहेत. औषधी पुरवठा, अंगणवाडी सुविधा, पेयजलाची पूर्तता करण्यात आली असून ३३० गावांमधील मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर पुरविण्यात आल्या आहेत. जळगाव शहरात मनपा स्तरावर मागील विधानसभा तसेच लोकसभा निवडणूक दरम्यान ज्या परिसरात मतदान टक्केवारी ३० टक्केच्या जवळपास होती. त्या परिसरात आशा वर्कर्स, बचत गट महिला, रिल्स, व्हॉटस अॅप मेसेज, ऑडिओ संदेश आदी सामाजिक माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली आहे. ३६१ केंद्रांवर मतदारांसाठी मूलभूत आवश्यक सुविधांची पूर्तता, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, लहान मुलांसाठी पाळणाघर आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
अपर पोलीस महासंचालक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेषण, राज्य महामार्ग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई रेल्वे पोलीस, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड जळगाव तसेच मध्य प्रदेशमधील होमगार्ड आदी विभागातून ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ३४० पोलीस कर्मचारी, ११७ वनविभाग कर्मचारी, ३ हजार महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश होमगार्ड असे कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय ३ आयटीबीपी, ४ सीआरपीएफ, २ आरपीएफ, १ एसएसबी, मध्य प्रदेशमधून ३ एसएपी, २ एसआरपीएफ अशा १४ कंपन्यांचा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.