जळगाव ( प्रतिनिधी ) – दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांना अवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी राज्यशासनाकडून ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान रविवारी, 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी महाराज नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग साधनांचे यावेळी वाटप करण्यात येणार आहे.
या अभियानात दिव्यांग लाभार्थीची प्रवर्गनिहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. आशा सेविका व आंगणवाडी सेविका यांचेकडून प्राप्त झालेले दिव्यांग लाभार्थीचे अर्ज तसेच यापूर्वी प्रलंबित असलेले अर्ज यावर उचित कार्यवाही करून त्यांना देण्यात येणारे लाभ /प्रमाणपत्र याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. कृत्रिम अवयव व सहाय्यभूत उपकरणे वाटप करणाऱ्या दिव्यांग स्वयंसेवी संस्था, संघटना व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांग लभार्थीची मोजमापे घेऊन लाभार्थीनिहाय अभिलेखे तयार करण्याचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.
शासनाचे विविध विभाग, महामंडळे, स्वयंसेवी संस्था व अशासकिय संघटना अशा सुमारे 39 संबंधित विभाग व कार्यालये या अभियानात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, संघटना यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांनी अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे.