जळगाव ( प्रतिनिधी) – रस्त्यावर भुकेल्यापोटी थंडीत कुडकुडणाऱ्यांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असते. जळगावातही रस्त्यावर कशाचा तरी आडोसा घेऊन झोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेघर, निराधारांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली.
कोणताही बडेजावपणा न करताना जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नीने अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने निराधारांचेही डोळे पाणावले व त्यांनी या दांपत्यास आशीर्वाद दिले.
ज्यांना घरच नाही व उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, अशा बेघर निराधारांची दिवाळी अंधारातच जाते. रेल्वे स्थानक परिसर व इतर ठिकाणीही रस्त्यावर बसून किंवा झोपून रात्र काढणार्यांना दिवाळीत ना पोटभर जेवण मिळाले, ना एक पणती लावू शकले. नवीन कपडे तर स्वप्नच. मात्र रात्री अचानक हे दांपत्य त्यांच्यासाठी देवदूत म्हणून आले व या निराधारांना भर थंडीत मोठा आधार मिळाला.
जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. अनुराधा राऊत कोणालाही न सांगता गरजूंना मदत करण्यासाठी दिवाळीच्या रात्री बाहेर पडले. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल, खाद्यपदार्थ, बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे साहित्य देऊन भर थंडीत मायेची ऊब दिली.
एका ठिकाणी आपले खाजगी वाहन लावून हे साहित्य हातात घेत पायी फिरत या दाम्पत्याने गरजूंना मदत केली. दिवाळीच्या रात्री अचानकपणे पोटाला आधार व थंडीपासून बचाव करणारे कपडे मिळाल्याने निराधारांचे डोळे पाणावले. या मदतीने भारावलेल्या बेघर, निराधारांनी या दांपत्यास आशीर्वाद देत दीर्घायुष्याची प्रार्थना केली.
बेघर निराधारांचे हे हाल पाहून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय जबाबदारी देखील सांभाळत या निराधारांना महापालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्याच्या हालचाली तात्काळ सुरू केल्या. यंदा थंडीचे प्रमाण अधिक राहणार असल्याने ही सर्व मंडळी सुरक्षित राहावे म्हणून त्यांना लवकरात लवकर निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत इतर वेळीदेखील निराधारांना मदत करीत असतात. यापूर्वी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतानादेखील त्यांनी हे कार्य केले. जळगावातदेखील ते सुरूच आहे. याविषयी ते कोणाला सांगत नाही. असे असले तरी यंदा दिवाळीच्या रात्री ते काही जणांच्या नजरेस पडले व ही बाब समोर आली. याविषयी ते कोणताही बडेजावपणा न करता मदत करीत असतात.
कोणाला मदत करायची असली तर अनेक जण मोठा फौजफाटा घेऊन व कॅमेरे घेऊन फोटोसेशन करीत मदत करतात. मात्र जिल्हाधिकारी सारखा व्यक्ती कोणताही मोठेपणा न करता गेल्या अनेक वर्षांपासून गरजूंना मदत करीत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे जळगावात आले तेव्हापासून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली कोरोना काळातदेखील रात्री व इतर कोणत्याही वेळी रुग्णालयांची स्थिती पाहण्यासाठी ते अचानक भेट द्यायचे अथवा ग्रामीण भागात जाऊन अचानक पाहणी करतात. काही त्रुटी आढळल्यास यंत्रणेला थेट धारेवर न धरता एक संधी देत सुधारणा करण्याच्या सूचना देतात. त्यांच्या या वेगळ्या कार्यशैलीमुळे आज जळगावात कोरोना देखील मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला.