बच्चू कडू, उन्मेष पाटील यांचे नेतृत्व, जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
जळगाव (प्रतिनिधी) : पिकाला, कापसाला हमीभाव मिळावा तसेच पिकविमा शेतकऱ्यांना तत्काळ मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज बुधवारी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी शेतकऱ्यांनी “ना पक्ष ना झेंडा, फक्त शेतकरी अजेंडा” असा प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आलेला होता. शिवतीर्थ मैदानापासून ट्रॅक्टर, बैलगाड्या त्यांच्यासह हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. माजी आ. बच्चू कडू, माजी खा. उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचला.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सभा घेण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान एकही अधिकारी त्या ठिकाणी न आल्याने अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार उघडून आत शिरले. पोलिसांना न जुमानता जिल्हाधिकारी यांचे दालनात जाऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील, गुलाबराव वाघ, निलेश चौधरी, कुलभूषण पाटील, भारतीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक लाडवंजारी, मनसेचे जमील देशपांडे आदी उपस्थित होते.









