नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘ महसूल सप्ताहाचे तर १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘महसूल पंधरवाडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या काळात विविध महसूली सेवांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थी, नागरिक यांना दिला जाणार असून त्या कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे.
या रूपरेषेनुसार जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील भूमिका निर्णायक करण्यासाठी शासनाने ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ सुरु केली आहे. त्या योजनेच्या अनुषंगाने अधिकाधिक विशेष शिबीर आयोजित करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेवून पोर्टल व डेटा सेंटर सुरळीत राहिल, जेणे करुन सर्व अर्ज अपलोड करता येतील. २ ऑगस्ट रोजी ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ चा लाभ अधिकाधिक युवकांना प्राप्त व्हावा, त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड इ. आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
३ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” चा लाभ अधिकाधिक ज्येष्ठ नारिकांना प्राप्त व्हावा, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांना तातडीने उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येईल. ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यात जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरील, मंडळ स्तरावरील व ग्रामस्तरावरील कार्यालयांची व परिसराची साफसफाई करण्यात येणार आहे. कार्यालयाचे अभिलेख व दस्तऐवज यांचे वर्गीकरण व व्यवस्थापन, निंदणीकरण व महत्वाच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग व म संगणकीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित सेवा, यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, शुल्क, सक्षम प्राधिकारी इत्यादी माहिती दर्शविणारे फलक अद्यावत करावेत.
५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”ही विशेष मोहिम राबविण्यात येईल.त्यात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले/प्रमाणपत्रे मिळण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किंवा समादेशक त अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अर्जावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचा-यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात यावी.
६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा” हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल. त्यात राज्याच्या दिव्यांग व्यक्तींकरीता शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजना/उपक्रमांबाबतची माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्या विविध विभागातील योजनांचा लाभ घेण्याकरीता आवश्यक असणा-या व महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले/प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल. ७ ऑगस्ट रोजी “महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार वितरण व महसुल सप्ताह सांगता समारंभ ” आयोजित करण्यात येणार आहे.