जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मयत तरुणाच्या कुटुंबीयांची घेतली भेट
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे एका १८ वर्षीय तरुणाचा डेंग्यू विषाणूच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी होऊन त्यांनी सर्व्हेक्षण सुरू केले होते. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गावात येऊन कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच आरोग्य उपकेंद्रात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन रेकॉर्ड तपासले. येथील कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच आशा अंगणवाडी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
शिरसोली गावातील देवेंद्र विकास बारी या १८ वर्षीय तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागून त्यांनी सर्वेक्षण सुरू केले होते. तसेच गावात फवारणी करणे, नागरिकांना सूचना करणे, आवाहन करणे सुरू केले होते. त्यानंतर आता शनिवारी १६ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी शिरसोली गावात येऊन मयत देवेंद्र बारी याच्या परिवाराची भेट घेतली.
त्या ठिकाणी त्यांनी माहिती जाणून घेतली. यानंतर आयुष आरोग्य उपकेंद्रामध्ये जाऊन तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांची झाडाझडती घेऊन सर्व रेकॉर्ड तपासले. औषधांच्या साठ्याबाबत माहिती घेऊन उपकेंद्राची काम करण्याची कार्यपद्धती याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच डेंग्यू विषाणू विरोधात गप्पी मासे गावात सोडतात काय याबाबत विचारणा केली. आरोग्यबाबत आढावा घेतला. आशा, अंगणवाडी आणि मदतनीस यांच्याशी संवाद साधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी आल्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली होती.
दरम्यान अधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य यंत्रणेने कायम सहकार्य दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.