जळगाव तालुक्यात महायुतीत तिकिटावरून होणार ताणाताणी, ‘घड्याळा’ला शक्यता धूसर
जळगाव (प्रतिनिधी) :- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रारूप गट-गण रचना जाहीर करण्यात आली आहे. नवीन गट-गण रचनेमुळे जळगाव तालुक्यातील अनेक इच्छुकांचे गणित बिघडवले आहे. तर काही जणांना मात्र या गट-गण रचनेचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, बदललेल्या गट-गणांबाबत २१ जुलैपर्यंत हरकती घेता येणार आहे. राजकीय वर्तुळात विजयासाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यात जि.प.चे. पाच गट आहेत. नशिराबाद हे सर्वाधिक मतदारांचे गाव आता नगरपरिषद झाल्यामुळे ते जि.प.मधून बाहेर पडले आहे. त्यामुळे जळगाव तालुक्यातील गट-गणांचे चित्र पालटले आहे. म्हणूनच राजकीय गणितेही बदलली आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे काही वर्षापासून म्हसावद-बोरनार गटातून तयारी करत आहेत; मात्र नवीन गट रचनेत त्यांचे जळके हे गाव म्हसावद गटातून आता शिरसोली गटात गेले आहे. त्यामुळे त्यांच्या तयारीला फटका बसला आहे; मात्र त्याचवेळी त्यांच्यासाठी शिरसोली व म्हसावद या दोन गटांचेही पर्याय उपलब्ध झाले आहेत.
भाजपचे माजी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे हे गेल्या वेळेस कानळदा गटातून विजयी झाले होते. या गटातील सावखेडा, घार्डी, करंज ही तीन गावे आसोदा गटात गेली आहेत. त्यामुळे या पंचवार्षिकला विजयासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. २०२२ मध्ये जाहीर झालेल्या गट-गण रचनेत या गटातून आव्हाणे हे गाव आसोदा गटात गेले होते. नवीन रचनेत आव्हाणे पुन्हा या गटात आले आहे, तर सावखेडा, करंज, घार्डी ही तीन गावे आसोदा गटात गेली आहेत. यामुळे भाजपचे अॅड. हर्षल चौधरी यांनाही त्यांचे गाव गटात आल्याने फायदा होऊ शकतो.भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील हे शिरसोली गटातून तयारी करत आहेत. या गटात आधीच भाजपकडून गिरीश वराडे, मनोहर पाटील इच्छुक आहेत.
जळके या गावाच्या समावेशामुळे ज्ञानेश्वर जळकेकरांनी या गटातून निवडणूक लढवली तर भाऊसाहेब पाटील, मनोहर पाटील, गिरीश वराडे यांच्या तयारीला फटका बसू शकतो. शिंदेसेनेतही अनेक इच्छुक आहेत. त्यात शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या गटात विशाल देवकर हेदेखील तयारीला लागले आहेत. शिंदेसेनेचे माजी जि.प.सदस्य पवन सोनवणे यांच्या म्हसावद गटात मोहाडी व सावखेडा या दोन्ही गावांचा समावेश झाल्यामुळे त्यांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. २०२२ मधील गट रचनेत ही दोन्ही गावे कुसुंबा गटात गेली होती. आता त्यांचा जुना गट कायम झाला आहे. शिंदेसेनेकडून तयारी करत असलेले राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, कैलास चौधरी यांनाही फार नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे. जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याही अडचणी आता नवीन गट रचनेने दूर झाल्या आहेत. कुसुंबा गटात रायपूर, कंडारी, चिंचोली ही गावे आली आहेत. या गावांसाठी लालचंद पाटील यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनाही दिलासा मिळाला आहे. कुसुंबा गटात रायपूर, कंडारी, चिंचोली या गावांचा समावेश करण्यात आला आहे. चौधरी यांनीही २०२२ मधील गट-गण रचनेवर आक्षेप घेतले होते.
गट-गणनिहाय गावांचा समावेश
कानळदा-भोकर गट
कानळदा गण- आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी, कानळदा, कुवारखेडे.
भोकर गण – नांद्रा बु., नंदगाव, फेसर्डी, फुपणी, पिलखेडा, फुपणी, किनोद, देवगाव, जामोद, भादली खु,, पळसोद, आमोदे बु.,
आसोदा-ममुराबाद गट
ममुराबाद गण – आवार, विदगाव, तुरखेडा, डिकसाई, रिथुर, घाडीं, करंज, सावखेडा खु.,
आसोदा गण – नांद्रा खु., देऊळसाडे, सुजदे, धामणगाव
कुसुंबा-भादली गट
भादली बु. गण भोलाणे, शेळगाव, कडगाव, जळगाव खु.,तरसोद
कुसुंबा खु, गण – मन्यारखेडा, निमगाव बु., बेळी, चिंचोली, कंडारी, रायपूर,
म्हसावद-बोरनार गट
मोहाडी गण – सावखेडा बु., धानोरे, दापोरे, लमांजन, बिलवाडी, वावडदे
म्हसावद गण – पाथरी, डोमगाव, वडली, बोरनार, जवखेडे
शिरसोली-धानवड गट
शिरसोली गण : शिरसोली प्र.बो., शिरसोली प्र.न.
धानवड गण – रामदेववाडी, उमाळे, विटनेर, वसंतवाडी, जळके, सुभाषवाडी, वराड बु., लोणवाडी