जळगाव जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा कारागृहातून बंदुकीचा धाक दाखवून पलायन केल्याच्या खळबळजनक प्रकरणातील मुख्य आरोपी सागर पाटील, सुशील मगरे याच्यासह ९ जणांची जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. १६ मार्च २०२६ रोजी तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. मोरवाळे यांनी हा निकाल दिला.

२५ जुलै २०२० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव उप-कारागृहाचा मुख्य दरवाजा उघडत असताना ही घटना घडली होती. कारागृह रक्षक पंडित दामू गुंडाळे हे ड्युटीवर असताना, कैदी सागर पाटील, गौरव पाटील आणि सुशील मगरे यांनी त्यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी गुंडाळे यांच्याकडून दरवाजाच्या चाव्या हिसकावून घेतल्या आणि तेथून पलायन केले. या पलायनासाठी बाहेरून अन्य साथीदारांनी मोटारसायकल आणि शस्त्रे पुरवून मदत केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. न्यायालयाने ९ जणांची सर्व आरोपांतून मुक्तता केली आहे.
यात सागर संजय पाटील (वय २३, रा. अंमळनेर), गौरव विजय पाटील (वय २२, रा. अंमळनेर), सुशील अशोक मगरे (रा. पहूर, ता. जामनेर), जगदीश पुंडलिक पाटील (वय १९, रा. पिंपळकोठे, ता. पारोळा), नागेश मुकुंदा पिंगळे (वय २२, रा. अंमळनेर), अमित उर्फ निलेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी (वय २१, रा. जळगाव), सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (वय २४, रा. अंमळनेर), चेतन उर्फ माया अनिल भालेराव (वय २२, रा. जळगाव), करण रतिलाल पावरा (वय २१, रा. शिरपूर, जि. धुळे) हे निर्दोष सुटले आहेत.
या प्रकरणात राहुल पाटील आणि दिगंबर बाळू कोळी हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे २५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, फिर्यादी पंडित गुंडाळे यांच्या साक्षीला बळकटी देणारा कोणताही स्वतंत्र पुरावा सादर करता आला नाही. कारागृहाच्या मुख्य दरवाजावरील सीसीटीव्ही फुटेज किंवा ड्युटी चार्ट यांसारखे महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. तसेच, जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा उघड्या आणि सार्वजनिक ठिकाणी सापडल्याने तो आरोपींचाच होता, हे देखील पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. संशयाचा फायदा देत आणि ठोस पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. एन. डी. चौधरी यांनी काम पाहिले.








