जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ तालुकास्तरावर २१ नोव्हेंबररोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान पार पडणार आहे. सोमवारी जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मतमोजणी करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित १० संचालकांच्या निवडणूकीसाठी ४२ उमेदवार सोसायटी व अन्य मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. या संचालक निवडणूकीसाठी सहकार विभागाचे कर्मचारी सज्ज झाले आहेत
या निवडणूक निमित्ताने प्रचार यंत्रणा शुक्रवारी थंडावल्या आहेत. सहकार व शेतकरी पॅनल मधील ४२ उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण थंडावणार यासह आणि त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी देखिल चुरस असून कोणाच्या हाती बँकेच्या चाव्या जातात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष आहे.
जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, गो.से.हायस्कूल पाचोरा, सु.गि.पाटील हायस्कूल भडगांव, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय चाळीसगाव, एन.ई.एस.हायस्कूल पारोळा, जी.एस.हायस्कूल अमळनेर, कस्तूरबा विद्यालय चोपडा, जि.प.शाळा धरणगांव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल याठिकाणी मतदान तर जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी केली जाणार असल्याचे निवडणूक अधिकार्यांनी म्हटले आहे.