नियमांचे उल्लंघन करून कर्ज मंजूर केल्याचे प्रकरण
जळगाव (प्रतिनिधी) : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगावच्या दगडी बँकेला अर्थात जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ३ लाख ५० हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ आणि ‘आपल्या ग्राहकाला जाणून घ्या’ (केवायसी) संबंधी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
नाबार्डने ३१ मार्च २०२४ रोजी केलेल्या तपासणीत बँकेत काही अनियमितता आढळून आल्या होत्या. यात प्रामुख्याने दोन बाबी समोर आल्या. बँकेने नियमांचे उल्लंघन करत आपल्या संचालकांशी संबंधित व्यक्तींना किंवा संस्थांना कर्ज मंजूर केले. बँकेने काही ग्राहकांना एकच युनिक आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी एकापेक्षा जास्त ओळख कोड दिले, जे आरबीआयच्या नियमांनुसार चुकीचे आहे. या संदर्भात आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. बँकेने दिलेल्या उत्तरावर आणि सुनावणीनंतर आरबीआयने हा दंड आकारण्याचा निर्णय घेतला.









