जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पतसंस्थेचे थकबाकीदार म्हणून उमेदवारी अर्ज अवैध ठरवले गेलेले नाना पाटील यांनी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह राज्य सहकार निवडणूक आयुक्त यांनाही प्रतिवादी ठरवत मुंबई उच्चं न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे . नाना पांडुरंग पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर आता मंगळवारी तातडीची सुनावणी न्या. आर. एन . लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे .
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा येथील रहिवाशी नाना पाटील यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज १८ ऑक्टोबररोजी दाखल केला होता . त्यानंतर २० ऑक्टोबररोजी झालेल्या छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता . नाना पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वतीने त्यांच्या सूचकाने हरकत नोंदवली होती. ही हरकत नोंदवताना नाना पाटील हे भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे थकबाकीदार असल्याचा दाखला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्या आधारावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला होता. कायद्याच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वतीने अशी सूचकाने हरकत नोंदवणे योग्य नसल्याचे कायद्याच्या अभ्यासकांचे मत आहे.
उमेदवारी अर्ज अवैध ठरवला गेल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात नाना पाटील यांनी नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले होते . नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी नाना पाटील यांचे अपील फेटाळले होते . त्यानंतर आता नाना पाटील यांनी उच्चं न्यायालयात धाव घेतली आहे.
नाना पाटील यांची ही याचिका उच्चं न्यायालयाने दाखल करून घेतली असून या याचिका क्रमांक २९८५५ / २०२१ ची सुनावणी आता तातडीने मंगळवारी न्या . आर एन . लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर होणार आहे . आपल्या उमेदवारी अर्जावर चुकीच्या पद्धतीने हरकत घेण्यात आल्याची तक्रार नाना पाटील यांनी भुसावळच्या पोलिसांकडे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही दाखल केली होती . ज्या थकबाकीदार दाखल्याच्या आधारावर आपली उमेदवारी अवैध ठरवण्यात आली त्या दाखल्याच्या सत्यतेची शहानिशा करून न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे असे नाना पाटील सुरुवातीपासून सांगत आहेत . आपला भुसावळच्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेशी काहीच संबंध नाही , आपण न घेतलेल्या कर्जाचे थकबाकीदार कसे आणि कधी झालो ?, असा प्रश्न त्यांनी पहिल्या दिवसापासून उपस्थित केलेला आहे
आता या याचिकेत नाना पाटील यांची बाजू अँड विनोद पी पाटील उच्चं न्यायालयात मांडत आहेत . राज्य सहकार कायद्याचे कलम १५२ ( अ ) नुसार या याचिकेत नाना पाटील यांनी आपले मुद्दे उपस्थित केले आहेत . निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह राज्य सहकार निवडणूक आयुक्त व नाशिकचे विभागीय सहनिबंधक यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे .
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आणि जिल्ह्याच्या राजकारणातही लक्षवेधी ठरलेल्या या याचिकेच्या सुनावणीकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.