माघारीपर्यंत चित्र स्पष्ट होणार
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेसाठी भाजपचा मुकाबला आता महाविकास आघाडीशी होणे निश्चित झाले असल्याचे संकेत जिल्ह्याच्या राजकारणातील उच्चंस्तरीय सूत्रांनी दिले आहेत. हा मुकाबला असाच होईल याबद्दलची अधिकृत घोषणा भाजप किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप झालेली नसली तरी उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काहीही झाले तरी जिल्हा बँकेत भाजपसोबत जाणे नकोच , अशी निर्वाणीची भूमिका जाहीर केल्यानंतर गेल्या आठवडाभरात या जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात रंगत आली आहे त्यानंतर सर्वपक्षीय पॅनलचा काही मार्ग निघू शकतो का याची चाचपणी करण्याचाही प्रयत्न झाला मात्र त्यासाठीच्या बैठकीतही काँग्रेसने भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केल्यांनतर नूरच पालटला . काल भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाल्यावर त्यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे जाहीर केले .
काँग्रेस जिल्हा बँकेसाठीही महाविकास आघाडी व्हावी आणि भाजपला जिल्हा बँकेपासून दूर ठेवावे असे सांगत असल्याने या पर्यायाचा विचार आता राष्ट्रवादी आणि शिवसेना कसा करतात याची उत्सुकता वाढलेली आहे . राज्याच्या सत्तेत हे तिन्ही पक्ष एकत्र असल्याने जिल्हा बँकेत महाविकास आघाडी ‘ पब्लिक अपील ‘ होऊ शकते याची जाण अर्थात या तिन्ही पक्षांना आहेच . या तिन्ही पक्षांचे राज्य पातळीवर नेतृत्व करणारे नेते आता काय भूमिका घेतात या उत्सुकतेच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात आडाखे बांधले जात आहेत . आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढविण्याचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यास वेळ वाया घालवून उपयोगाचे नाही, असे या तिन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना वाटते आहे त्यामुळे कदाचित पुढच्या १ ते २ दिवसात या तिन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांची संयुक्त पत्रपरिषद घेऊन हा तसा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो असे अंदाज लावले जात आहेत .
महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्यापॆक्षा भाजपला सोबत घेऊन आणि काँग्रेसला बाजूला ठेऊन जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवावी तर लोकांपुढे जाऊन कशाच्या आधारावर तशा भूमिकेचे समर्थन करावे , हा यक्ष प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी ठरला असता . तसे झालेही असते तर राज्य आणि देशपातळीवर भाजपला विरोध करणारे राष्ट्रवादी आणि शिवसेना फक्त सत्तेसाठी जिल्ह्यात भाजपसमोर नरमले असे संकेत लोकांपर्यंत गेले असते आणि या दोन्ही पक्षांच्या प्रतिमेला तसे करणे परवडणारे नाही म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही नेते या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करत आहेत असेही या उच्चंस्तरीय सूत्रांनी सांगितले .