जळगाव ( प्रतिनिधी ) – महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत . त्याला कारण स्वतःमधील आत्मविश्वास व संघर्षाची जिद्द असल्याने आपण आज बरोबरीत काम करीत आहोत. जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच क्रीडांगणावर उतरा व जिंकून या असे आवाहन आज महापौर जयश्री महाजन यांनी हॉकी महिला खेळाडूंना केले.

पुणे येथे एस.एन.बी.पी क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हॉकी महिला स्पर्धेला ११ नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून, या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या स्पोर्ट्स हाऊस संघालासुद्धा प्रवेश मिळाला संघाला छत्रपती शिवाजी महाराज किडा संकुल येथे शुभेच्छा देण्यासाठी महापौर जयश्री महाजन ,रायसोनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती.
शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी करियर असले तरी क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आज महिलांना विविध संधी उपलब्ध असून, त्यामुळे त्या आपला व कुटुंबियांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू शकतात त्यासाठी ठराविक शिक्षण पद्धतीचे अवलंब न करता सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीचा अंगीकार करावा व त्यासोबत क्रीडा क्षेत्रात खेळत राहिल्यास त्याचा उपयोग खाजगी आयुष्यात निश्चित होतो असेही त्यांनी खेळाडूंना सांगितले.
ऑलंपिक स्पर्धेत भारताच्या महिला व पुरुष सदस्यांनी चोख कामगिरी पार पाडल्याने भारताला हॉकीमध्ये चांगले दिवस आले असल्याने आपण जळगावकर महिलांनी सुद्धा याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा फायदा होईल हे करून घ्यावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले.
क्रीडा क्षेत्रात जळगावातील विविध संस्था, संघटना, औद्योगिक क्षेत्र व दानशूर व्यक्तिमत्व मदत करण्यास तयार असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील स्पोर्ट हाऊससुद्धा प्रयत्नशील असल्याने स्पोर्ट हाऊसचा हॉकीचा संघ निश्चितच या स्पर्धेत चांगली कामगिरी पार पडेल व जळगावचे नाव अजरामर करेल अशी आशा हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक लियाकत अली सय्यद यांनी केले तर आभार संघाच्या सहव्यवस्थापिका हिमाली बोरले यांनी मानले.
भाग्यश्री कोळी, निशा कोंडाळकर , भाग्यश्री शिंपी, दिव्या शिंपी, सुनैना राजपाल, नूतन शेवाले, सायली खंडागळे, दीपिका सोनवणे, हिमाली बोरोले, सरला अस्वार, गायत्री अस्वार, रुपाली अस्वार, आरती ढगे, निकिता पवार, वैष्णवी चौधरी, अश्विनी वंडोळे, रोशनी राठोड, ममता नाईक यांचा या संघात समावेश आहे संघाचे प्रशिक्षक म्हणून लियाक़त अली सैयद तर व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार व सहव्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोले यांची निवड हॉकी जळगांवचे फारूक शेख यांनी घोषित केली.







