पाचोरा पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम
पाचोरा (प्रतिनिधी):- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा यासाठी पाचोरा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘मिशन स्कॉलरशिप’ अंतर्गत इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा शुक्रवारी उत्साहात पार पडली.


जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. पाचोरा तालुक्यात या परीक्षेचे नेटके नियोजन गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे व गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले होते. तालुक्यातील केंद्र स्तरावर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षेत तालुक्यातून एकूण ५४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये इयत्ता पाचवीचे ४३४ विद्यार्थी, इयत्ता आठवीचे ११३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
केवळ परीक्षाच नव्हे, तर या उपक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तज्ज्ञ शिक्षकांद्वारे मार्गदर्शन वर्गही चालवले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दलचा आत्मविश्वास वाढत आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील व सरोज गायकवाड, परीक्षा समन्वयक सुभाष देसले, रावसाहेब साळुंखे, सुनील शिवदे, गिरीश भोयर यांच्यासह सर्व केंद्रप्रमुखांनी विशेष परिश्रम घेतले. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी विशेष शिक्षकांनी विविध शाळांना भेटी देऊन पाहणी केली.
“विद्यार्थ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी तालुक्यात अशा एकूण दोन सराव परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.”
— विजय पवार, गटशिक्षणाधिकारी, पाचोरा.








