एरंडोल तालुक्यात रवंजे येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – येथील गांधी रिसर्च फाउंडेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रवंजे बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन पुरस्कृत शिक्षण सप्ताह व वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला. जिल्हा परिषद मराठी शाळा व गौरीशंकर माध्यमिक विद्यालय येथे विविध प्रकारची १५० झाडे विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त वन अधीकारी तथा सल्लागार वन वन्यजीव व पर्यावरण विभाग जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेड राजेंद्र राणे होते. सोबत बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव आधार माळी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका यांच्यासह केंद्रप्रमुख मनीषा सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावात इको क्लबची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात मनीषा सोनवणे आणि राजेंद्र राणे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, आणि वृक्ष संवर्धनाची गरज याबद्दल त्यांनी महत्वपूर्ण प्रतिपादन केले.
प्रत्येक विद्यार्थ्याने “एक मूल, एक झाड” आणि “एक पेड माँ के नाम” या शासनाच्या धोरणानुसार वृक्ष संवर्धन करावे व ग्रामस्थांनी त्यांच्या शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करून त्यांचे जतन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे क्षेत्रीय अधीकारी प्रशांत सूर्यवंशी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते मुकेश भालेराव, पंकज चौधरी, प्रदीप देशमुख, आणि संदीप तायडे यांनी परिश्रम घेतले.