खासदार उन्मेष पाटलांनी शक्यता फेटाळली

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगरपालिकेमध्ये विकासासाठी निधी भरपूर मिळाला आहे. त्या शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जाचा डोंगर देखील उतरला आहे. त्यामुळे मनपात खांदेपालटची शक्यताच उरत नाही अशी माहिती खा. उन्मेष पाटील यांनी जळगाव भाजप कार्यालयात भाजप नगरसेवकांची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सागितले .
येथील भाजपच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी खा. उन्मेष पाटील, आ. सुरेश भोळे, महापौर भारतीताई सोनवणे, स्थायी सभापती राजेंद्र घुगे (पाटील), महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये महानगरपालिकेशी संबंधित असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खा. उन्मेष पाटील म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे महानगरपालिकेतील विविध विकास कामांचा वेग वाढविण्यासाठी कर्जाचा डोंगर कमी करण्यात आला. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा केल्याबद्दल आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.यापुढे देखील जळगाव महानगरपालिकेतील काही विकास कामे प्रलंबित आहेत त्या विकासकामांना गती कशी येईल यादृष्टीने आमदारांच्या पुढाकारातून व सहकार्याने सर्व नगरसेवकांनी प्रयत्न करण्याविषयी या बैठकीत माहिती दिली. महानगरपालिकेत खांदेपालट होणार काय या प्रश्नावर खा. पाटील यांनी शक्यता फेटाळून लावली.







