अ.भा.नाट्यपरिषद,जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण
जळगाव (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार विशाल जाधव यांना प्रदान करण्यात आला.हे रंगकर्मी पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष अॅड.संजय राणे यांच्या हस्ते दोन्ही रंगकर्मींना प्रदान करण्यात आले. मानपत्र, रोख रुपये पाच हजार व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली. गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्काराने स्थानिक कलावंतांचा गौरव करण्यात येतो. पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी रंगमंचावर सहकार्यवाह योगेश शुक्ल, नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, समन्वयक पवन खंबायत, ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ, ॲड.नितीन देशमुख, पियुष नाशिककर, उमेश घळसासी आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कलावंत चिंतामण पाटील हे गेल्या पाच दशकांपासून जळगावच्या रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांनी महाविद्यालयीन काळापासून जळगावची रंगभूमी गाजवली आहे. त्यांनी २६ जानेवारी १९७९ रोजी स्थापन केलेल्या खान्देश नाट्य प्रतिष्ठान या संस्थेला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. आजवर सादर केलेल्या सरहद्द, सापळा, मध्यरात्रीचा सूर्य, हुंडेकरी, रंग उमलत्या मनाचे, दीपस्तंभ, माणूस एके माणूस, आनंदमयी, सावल्या यासह अनेक पुरस्कारप्राप्त एकांकिका व नाटकांचे सादरीकरण जळगावचे नाव राज्यभरात पोहचविलेले आहे.
तसेच युवा रंगकर्मी पुरस्कारप्राप्त रंगकर्मी विशाल जाधव यांनी आपली अभिनय कारकिर्द शाहीर विनोद ढगे यांच्या पथनाट्य पथकापासून सुरु करुन नंतर विविध संस्थांच्या एकांकिका व नाटकातून अभिनय करत अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यानंतर स्वतःची समर्थ बहुउद्देशीय संस्था स्थापन करुन राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, महावितरण नाट्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांतून यश संपादन केले आहे.