धुळे, (प्रतिनिधी) – जिल्हा कारागृहातून पलायन केलेल्या आरोपीला धुळे शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी अवघ्या दोन तासात शिताफीने जेरबंद केले.
धुळे जिल्हा कारागृहातील न्यायाधिन बंदी अर्जुन रंगनाथ आव्हाड हा आज दुपारी ३.४० वाचेच्या सुमारास कारागृहातील दवाखाना विभागातील बॅरक क्रं. २ च्या टॉयलेटच्या छतावरून उडी मारून पळुन गेला.
याबाबत धुळे कारागृह प्रशासनामार्फत धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना समजले. त्यांनी तत्काळ आरोपीचा माग काढून त्याला शोध काढण्यासाठी पथके रवाना केली. त्यादरम्यान न्यायाधिन बंदी हा सत्यसाईबाबा नगर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पो.ना. योगेश चव्हाण, निलेश पोतदार, कमलेश सुर्यवंशी, गुणवंत पाटील, किरण भदाणे हे लागलीच तेथे पोहोचले. पोलिसांना पाहून न्यायाधिन बंदीने पळ काढला. तो कॉलनी परिसरातील घरांचे छतावरून उड्या मारत पळू लागला. परंतू, कर्मचार्यांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याला देवपूरातील नकाणे रोडवरील महादेव मंदिराजवळ पकडले.
दरम्यान न्यायाधिन बंदी अर्जुन रंगानाथ आव्हाड हा देवपूर पश्चिम पोलिसात भादंवि कलम ३६३, ३६६, ३७६, ३४ व पोक्सो कायदा कलम ४, ८ या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता