नवीमुंबई (वृत्तसंस्था) – पंढरपूर भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानाला कोरोनानं घेरलं. या जवानाची कोरोनाविरोधातली झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. सिक्कीम इथे आपलं कर्तव्य बजावत असलेले 30 वर्षांचे जवान अमोल किरण आदलिंगे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमोल हे पंढरपूर जिल्ह्यातील कमलापूर गावचे रहिवासी होते. भारत-तिबेट सीमा पोलीस दलात 2012 मध्ये त्यांची भरती झाली आणि भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं होतं. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत आपलं कर्तव्य बजावत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. जवान अमोल यांची कोरोनाविरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे.
जवान अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. जवान अमोल यांच्या पार्थिवावर सिक्कीम इथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 झाली आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 524 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 971 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.3% असून 100 टेस्टपैकी आठ लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. देशात अजूनही 9 लाख 2 हजार 425 अॅक्टिव्ह केस आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडु सह 10 राज्य अशी आहे जेथे 77% अॅक्टिव्ह केसेस आहेत.