नातेवाईकांचा खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ; मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका
जळगाव (प्रतिनिधी ) २ ऑगष्ट रोजी एका ७२ वर्षीय वृद्धाला मारहाण केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या वृद्धाचा आज पाहते ३ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी आज जिल्हा रुग्णालयात संबंधित मारहाण करणाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने येथे आज सकाळी गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथील रहिवाशी बाळू रायसिंग पाटील (वय ७२) यांना २७ जुलै रोजी त्यांच्या शेजारी राहणारे विजय भिमसिंग पाटील आणि बाळू पाटील यांच्या परिवारामध्ये वाद झाला होता . मात्र काही ग्रामस्थानी हस्तक्षेप करून हा वाद मिटविला होता . त्यामुळे पुन्हा दोन्ही कुटुंबियातील वाद २ ऑगष्ट रोजी उफाळून आल्याने बाळू पाटील यांच्यासह त्यांची पत्नी इंदुबाई, मुलगा संजय व सून अनिता या सर्वांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत बाळू पाटील हे जखमी झाले होेते. त्यांना त्याच अवस्थेत एरंडोल पोलीस ठाण्यात नेण्यात आले होेते. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यानंतर बाळू पाटील यांना एरंडोल येथील आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक उपचाराअंती २ ऑगस्ट रोजी रात्रीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. शनिवारी पहाटे तीन वाजता उपचार सुरु असतांना बाळू पाटील यांचा मृत्यू झाला. मयत बाळू पाटील यांच्या पश्चात पत्नी इंदुबाई, मुलगा संजय, दिलीप, सूना व नातवंडे असा परिवार आहे.दरम्यान मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.