मातृभूमीच्या रक्षणासाठी हजारो पोलिसांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्या शहिदांना नमन करण्यासाठी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. साजरा यासाठी म्हणावे की, मातृभूमीच्या रक्षणार्थ जो प्राणांची आहुती देतो, त्याच्या मरणाचे दुःख न मानता त्या शहिदांचे ‘स्मरण उत्सव’ साजरे करण्यात येतात….
एका शायरने असे म्हटले आहे की,
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले…
वतन पर मर मिटनेवालो तुम्हारा यही निशा होगा …
21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात लडाख हद्दीत बर्फाच्छादित 16 हजार फूट उंचीवर असलेल्या हॉटस्प्रिंग या अत्यंत निर्जनस्थळी रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवान गस्त घालीत असताना, अचानक चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला त्यात भारत मातेच्या 10 जवानांना वीरमरण आले. या जवानांनी शौर्याने शत्रू विरोधात लढा देऊन शेवटी मृत्यूला अलिंगन दिले, या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून दरवर्षी 21 ऑक्टोबरला देशभरातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते.
देशातील आंतरिक सुरक्षा सांभाळताना आतंकी हल्ल्यात, नक्षलवादी कारवाईत व समाजकंटकांचे हिंसक कृत्य रोखताना मायभूमिसाठी जे पोलीस जवान शहीद होतात 21 ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयात, शहीद स्तंभासमोर ‘स्मरण सोहळ्याचे’ पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले जाते, शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांचा सन्मान केला जातो.’शोकशस्त्र’ करून वर्षभरामध्ये जे पोलीस जवान शहीद झालेले आहे, त्यांच्या नावाचे वाचन केले जाते. पोलीस तुकडीकडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना सलामी दिली जाते. त्यातून उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना प्रेरणा मिळत असते.
देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा यज्ञकुंड पोलिस बांधवांकडून अखंड धगधगता ठेवला जातो म्हणूनच आपण घरामध्ये रात्री शांत झोपू शकतो; परंतु तो सुरक्षेचा यज्ञकुंड सहजासहजी पेटत नाही; अनेक विरांच्या देहाचे दान घेत असतो.त्यामध्ये वीर जवानांचे रक्ताचे आणि हाडांची समिधा वाहिली जाते आणि त्यातून निघालेल्या अग्निज्वाळेतून कसाबसारखे आतंकवादी, समाजकंटक, देशद्रोही राख होत असतात.
शृंगार से पहले मैं अंगार लिखता हू
इश्क से पहिले मैं इन्कलाब देखता हू
कोई पुछे अगर मेरी मोहब्बत का नाम क्या है
तो मेरे खूनोकलमसे मैं मेरी भारत माता का नाम लिखता हू
– पो.ना. विनोद अहिरे,
९८२३१३६३९९