पाचोरा तालुक्यातील बांबरुड येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरीत पाय घसरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
सैनिक रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८ वर्ष) असे मयत जवानाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरुड खुर्द ता. पाचोरा येथील रहिवासी व आसाम रायफल शिलॉंग येथे नोकरीस होता.(केसीएन)हा जवान दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शेतात फेरफटका मारायला गेला असता त्याचा विहिरीत पाय घसरून विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे चुलत भाऊ गोपाल पाटील हा सकाळी ११ वाजता शेतात गेला असता विहिरीजवळ चप्पल, रुमाल दिसल्याने रविंद्र पाटील हा विहिरीच्या पाण्यात पडला असावा असा संशय त्याला आला.
याबाबत घटनेची वार्ता गावात पोहोचताच नातेवाईकांसह नागरिकांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पाचोरा येथील हुसेन शेख यांना बोलवण्यात आले. त्यांनी विहिरीच्या पाण्यातून रविंद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढला.(केसीएन)यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. जवानाला भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज जाधव यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.