जळगाव ;- जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बँकेच्या बचत गटांच्या महितीचा समावेश असलेल्या वेब पेजचे उद््घाटन मरिआई महिला बचत गटाच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. जनता सहकारी बँकेत बचत गटांच्या कामास २००३पासून सुरुवात झाली. बँकेचे ३८०० बचत गट आहेत. या सर्व बचत गटांची विस्तृत माहिती या वेब पेजच्या माध्यमाने उपलब्ध केल्याने महिला बचत गटांच्या कार्याची व उत्पादनांची माहिती होऊन त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) डीडीएम श्रीकांत झांबरे यांनी महिला बचत गटांच्या कामामुळे महिलांची प्रगती होत असून अशीच चिकाटी व जिद्द त्यांनी कायम ठेवावी, असे आवाहन केले. जास्तीत जास्त नागरिकानी बँकेच्या महिला बचत गटाच्या वेब पेज www.jjsblshg.com ला भेट द्यावी, असे आवाहन जनता सहकारी बँकेने केले आहे. प्रास्ताविक बचत गट विभाग प्रमुख प्रियंका झोपे यांनी केले. या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, बँकेचे संचालक सतीश मदाने, कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, सावित्री सोळुंखे, माजी संचालिका शोभा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील उपस्थित होते.








