जामनेर (प्रतिनिधी) – शहरातील बोदवड चौफुली येथे टाटा मालवाहतुकीतून ४ गोऱ्ह्यांची अवैध वाहतूक करताना कारवाई केली आहे. चालक फरार असून याप्रकरणी जामनेर स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांना माहिती मिळाल्यावरून बोदवड चौफुली येथे दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास एका मालवाहतूक वाहनाला थांबविण्यात आले. वाहनांची तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे गोऱ्हे मिळून आले. हे गोऱ्हे दोरीने घट्ट बांधलेले होते. तातडीने या गोऱ्ह्यांना उतरविण्यात आले. गाडी चालक शेख फिरोज शेख भिकन (वय ३५, वाघारी ता. जामनेर) हा फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोकॉ जगदीश गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजू तायडे करीत आहेत.