जामनेर ( प्रतिनिधी ) – शहरामधील जामनेरपुरा भागातील शास्त्रीनगरमध्ये सतत ४ महिन्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.
नेहमी शहरातील काही भागामध्ये वीज असते तर काही भागामध्ये गायब होते वारंवार उद्भवणारी ही समस्या असल्याने लोक वैतागले आहेत.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सागूनदेखील काही उपयोग होत नाही म्हणून आज शास्त्रीनगरमधील महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला.
घरामध्ये लहान मुले आहेत आणि सध्या डेंग्यूची साथ असल्याने नागरिकांना समस्याना सामोरे जावे लागत आहे.शास्त्रीनगरमधील गजानन महाराज मंदिरजवळ असलेली डीपी तीन वेळेस जळाली त्यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार सागूनदेखील या समस्येचे निराकरण केले जात नाही , असे या महिलांनी सांगितले. ही समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर मोठ्या संख्येने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा पवित्रा स्थानिक नागरिक व महिलांनी घेतला आहे.